पुणे : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित ३ ते १८ वयोगटातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांचे शिक्षण पुढे सुरू राहावे, यासाठी दि. ५ ते २० जुलै या कालावधीत सर्वेक्षण करून शाेध घेतला जाणार आहे. जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय नाईकडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बाळकृष्ण वाटेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जे. बी. गिरासे उपस्थित हाेते.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात शाळेत कधीच दाखल न झालेली बालके, शाळेत प्रवेश घेतलेली, परंतु प्राथमिक शिक्षण पूर्ण न केलेली १ महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने शाळेत अनुपस्थित राहत असलेली बालके आणि कुटुंबासोबत स्थलांतरित होऊन येणारी व जाणारी बालके यांचा शाेध घेतला जाणार आहे. या सर्वेक्षणात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महिला व बालविकास, कामगार आयुक्तालय, आदिवासी विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य, गृहविभाग आणि शिक्षण विभागाच्या समन्वयाने शाेधमाेहीम राबविण्यात येणार आहे.
काेठे राबविणार शाेधमाेहीम?
रेल्वे, बसस्थानके, फुटपाथ, सिग्नल, हॉटेल, खाणावळी, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, वीटभट्ट्या, दगडखाणी साखर कारखाने तसेच बालमजूर असण्याची शक्यता असलेली ठिकाणी जिल्हा, तालुका, केंद्र व गाव पातळीवर शाळाबाह्य मुलांचा शाेध घेतला जाणार आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक तसेच अंगणवाडीसेविका, मदतनीस, स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.