लोकमत न्यूज नेटवर्कओझर : ओझर आणि परिसरात मॉन्सूनने हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.दुपारनंतर ढग जमा होऊन हलक्या सरी पडण्यास सुरुवात झाली. वातावरणातील गरमी कमी होऊन गारवा निर्माण झाला आहे. मॉन्सूनच्या आगमनामुळे आता शेतकरीवर्गात खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मृग नक्षत्रात मॉन्सूनपूर्व पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीच्या मशागती करून काही शेतकऱ्यांनी पेरणीदेखील केली होती. दरम्यान, पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र चिंता पसरली होती. अगोदर पेरणी केलेल्या शेतकरीवर्गापुढेदुबार पेरणीचे संकट तर इतर पेरण्या खोळंबल्या होत्या. दुपारनंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे आता खरिपातील पीकपेरणीची चिंता संपुष्टात आली आहे. या परिसरात असणाऱ्या शिरोली बुद्रुक, शिरोली खुर्द, तेजेवाडी, कुमशेत, आगर, हापूसबाग, कुरण, धालेवाडी, येडगाव, कैलासनगर, हिवरे बुद्रुक, खुर्द या गावांमधे ऊसपिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. खरीप हंगामात सोयाबीनचे नगदी पीक म्हणून शेतकरी या पिकाला प्राधान्य देतात भुईमूगपिकदेखील थोडेफार उत्पादन होते. या भागात खरिपातील बाजरीपिक हद्दपार झाले आहे. उन्हाळा हंगामात बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
मॉन्सूनच्या हजेरीने शेतकऱ्यांत समाधान
By admin | Published: June 26, 2017 3:58 AM