लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : माथाडी कायद्याचा धाक दाखवत नोकरदारांंना, विशेषतः बदलीमुळे घरसाहित्यांचे शिफ्टिंग करावे लागणाऱ्यांना फसवण्याचे प्रकार होत आहेत. अशा प्रकारच्या कामासाठी हा कायदा लागू होत नसल्याचे माथाडी कामगार मंडळाकडून सांगण्यात आले.
व्यावसायिक साहित्याची चढ-उतार करणाऱ्या कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी हा कायदा आहे. त्यासाठी स्वतंत्र माथाडी मंडळ आहे. त्याचे नियम आहेत. कायदे आहेत. त्याचाच धाक दाखवत काही गुंडप्रवृत्तीचे लोक सामान्यांकडून लूट करत आहेत व त्यातून कायद्याची बदनामी होत आहे.
माथाडी कामगार मंडळाचे अध्यक्ष विशाल घोडके यांंनी सांगितले की, नोंदणी केली की त्या आस्थापनांना (ज्यांच्याकडे असे काम करणारे कामगार आहेत त्यांना) बिलाचे सगळे पैसे मंडळात जमा करावे लागतात. त्यातून ३५ टक्के रक्कम कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांसाठी कपात होते व उर्वरित रक्कम संबंधित आस्थापनेला दिली जाते.
हे पैसे द्यावे लागू नयेत म्हणून अनेक आस्थापना स्वतःची, तसेच आपल्याकडील कामगारांची नोंदणी करत नाहीत. पुणे जिल्ह्यासाठी किमान २५ हजार कामगारांची गरज आहे, प्रत्यक्षात मात्र फक्त साडेआठ हजार कामगारांची व साडेचार हजार आस्थापनांचीच मंडळात नोंद आहे. नोंदणी केली नसतानाही अनेकजण या कायद्याचा आधार घेत जबरदस्तीने जादा पैसे वसूल करत असल्याची माहिती घोडके यांनी दिली.
कारवाई टाळण्यासाठी याप्रकारचे काम करणाऱ्या आस्थापनांनी आपली व कामगारांचीही त्वरेने मंडळात नोंदणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. “बाणेर, बालेवाडी, खराडी या क्षेत्रात असे प्रकार वारंवार होत असल्याचे दिसते आहे. घरसाहित्यासाठी माथाडी कायदा लागूच होत नाही, त्यामुळे काम करणारे तसे सांगत असतील तर थेट पोलिसांकडे तक्रार करावी. मंडळही त्याची दखल घेईल,” असे ते म्हणाले.