पुणे : फुटबॉल खेळण्यावरून सहा महिन्यांपूर्वी वाद झाला हाेता. त्या वादातून अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने एका तरुणाला कोयता व लाकडी बांबूने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी चौघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अब्दुल्ला आमीरउल्ला खान (वय १९, रा.लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार गजराज चौकात २८ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता घडला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. फुटबॉल खेळण्यावरून सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून फिर्यादी हे त्यांच्या मित्रांबरोबर दुचाकीवरून जात होते. तेव्हा लक्ष्मीनगरमधील गजराज चौकात चौघा अल्पवयीन मुलांनी त्यांना अडविले. त्यांच्यावर कोयत्याने वार केला. लाकडी बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यांचा मित्र महेश मिश्रा यास लाकडी बांबूने मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केली. तेथील दोन रिक्षांच्या काचा फोडून त्यांचे नुकसान केले. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.