पुणे : अल्पवयीन १५ वर्षीय मुलीला शिक्षण देण्यासह चांगले जीवन जगण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतल्याप्रकरणात दोन महिलांसह दोन पुरुषांना न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी हा निकाल दिला. सक्तमजुरीच्या शिक्षेसह महिलांना प्रत्येकी २९ हजार ५०० रुपये व पुरुषांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. यात पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीदरम्यान, पीडितेचा जन्मदाखला नव्हता. यावेळी सरकार पक्षातर्फे शाळेतील निर्गम उतारा सादर करण्यात आला तसेच शिक्षिकेची साक्ष नोंदविण्यात आली.
कोमल सुनील मोरे उर्फ कोरे (वय २६, रा. कोथरुड. मूळ रा. भोर), रेश्मा महेश गायकवाड उर्फ रेश्मा सुरोसे (वय २९, रा. उत्तमनगर), सुनील ब्रिजलाल कोरी (वय २९, रा. येवलेवाडी, मूळ गाव उत्तर प्रदेश), जसाराम भयाराम सुतार (वय ५७, रा. सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नितीन कोंघे यांनी काम पाहिले. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले. साक्षीनंतर गुन्हा घडतेवेळी अल्पवयीन मुलीचे वय १५ वर्षे होते, हे सिद्ध झाले. तसेच मुलीच्या साक्षीमध्ये कोमल हिने पळवून नेले हे सिद्ध झाले. याखेरीज, वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर नेत त्यामार्फत पैसे कमावले तसेच आरोपी पुरुषांनी वेळोवेळी संबंध प्रस्थापित केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने शिक्षा सुनावली.