पुणे ( येरवडा ) : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या सोसायटीतील सदस्याला बांधकाम थांबवण्याची विनंती सोसायटीचे अध्यक्ष व संचालकांनी केली होती. पण या सदस्याने काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना फोन करून बोलावत अध्यक्ष व संचालकांनाच शिवीगाळ करत मारहाण केली. हा सर्व प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी सोसायटीचे संचालक कपिल पांडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून येरवडापोलिसांनी प्रताप साळुंखे यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
येरवडा येथील हरी गंगा सोसायटीतील प्रताप साळुंखे व नोमानी हाडी यांनी त्यांच्या फ्लॅट लगत विनापरवाना अनधिकृत बांधकाम सुरू केले होते. बांधकाम करु नका हे सांगण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष शेखर बोगींर व इतर संचालक गेले असता त्यांना प्रताप साळुंखे व त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच हे बांधकामाला विरोध केल्यास सर्वांना बघून घेऊ असे धमकी देखील दिली. याप्रकरणी सदर व्यक्तींवर गुन्हे दाखल होऊ नयेत यासाठी गृहविभागाच्या शासकीय तक्रार निवारण समितीवरील 'एका' सदस्याने हस्तक्षेप केल्याचे समजते.
हरीगंगा सोसायटीत उच्चभ्रू तसेच अधिकारी वर्ग वास्तव्यास आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी सोसायटीतील नागरिक व रहिवासी यांनी केलेली आहे.