पुणे : मावळ तालुक्यातील खांडशी गावच्या तलाठ्याला शेतकऱ्याकडून दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. कार्ला येथील मंडल कार्यालयाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी तलाठी अंकुश रामचंद्र साठे (४३) याच्याविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करणात आला. याबाबत एका शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. सातबारा उताऱ्यात दुरुस्ती करण्यासाठी खांडशी गावचे तलाठी साठे याने शेतकऱ्याला दहा हजारांची लाच मागितली होती. लाचेची रक्कम घेऊन कार्ला येथील मंडल कार्यालयात शेतकऱ्याला साठेने बोलावले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या साठेला पकडले.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत.