पुणे : शिक्रापूर येथील सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण परवाना देण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ४० हजार लाच देण्याचे ठरले. सुरूवातीला १२ हजार रुपये लाच देताना संजय कडाळे ( सहाय्यक अधीक्षक, जिल्हा रुग्णालय पुणे) लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले.
ही लाच घेण्यामध्ये रुग्णालयातील डॉ. माधव कणकवळे व जिल्हा शल्य चिकित्सक महादेव गिरी यांचाही अप्रत्यक्ष संबंध होता. त्यांनीच या लाचेची मागणी फिर्यादीकडे केली होती. संजय कडाळे, डॉ. माधव कणकवळे व महादेव गिरी हे औंध येथील जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने तक्रार दाखल केल्यानंतर ६ जुलैला सापळा रचण्यात आला होता. फिर्यादीकडून लाच घेण्यासाठी आरोपी संजय कुडाळ घटनास्थळी आल्यानंतर एसीबीने कारवाई केली. आरोपी कुडाळसह त्याच्याकडील १२ हजार रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर, पोलीस उपअधीक्षक सीमा अडनाईक, पो. हवा. नवनाथ वाळके, पो. हवा. अंकुश माने, चालक पो. कॉ. पांडुरंग माळी यांनी केली.