पुणे : जमिनीचा फेरफार मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) सापळा रचून घोडेगाव येथील मंडळ अधिकार्याला खासगी व्यक्तीच्या मदतीने रंगेहाथ पकडले.
योगेश रतन पाडळे (वय ३८) असे या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. तर लक्ष्मण सखाराम गायकवाड (वय ६१) असे खासगी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३६ वर्षांच्या नागरिकाने तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या मामाच्या मुलाने जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीचा फेरफार मंजर करण्यासाठी मंडळ अधिकारी योगेश पाडळे याने १० हजार रुपयांची लाच मागितली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केल्यावर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने घोडेगाव तहसील कार्यालयासमोर सापळा लावला. तहसील कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये मंगळवारी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना योगेश पाडळे याला पकडण्यात आल्या. लक्ष्मण गायकवाड याने लाचेची मागणीस सहाय्य केले, म्हणून दोघांवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अलका सरग अधिक तपास करीत आहेत.
लाचेची मागणी केल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधा
हेल्पलाईन क्रमांक १०६४०२० - २६१२२१३४/ २६१३२८०२
व्हॉटसॲप - ७८७५३३३३३३