लोणावळा : गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागत यापैकी दीड लाख रुपयांची लाच खाजगी व्यक्तीच्या हस्ते स्विकारल्या प्रकरणी सहाय्यक फौजदार व खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून त्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे पोलीस निरीक्षक यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक प्रविण बाळासाहेब मोरे (वय 50, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण), कुतुबुद्दीन गुलाब खान (वय-52, सहायक पोलीस उपनिरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे) व खाजगी व्यक्ती यासीन कासम शेख (वय 58) यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार एका गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी सहाय्यक फौजदार कुतुबुदद्दीन गुलाब खान याने दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती दीड लाख रुपये रक्कम निश्चित करण्यात आली होती. ही रक्कम वाकसई येथे खाजगी इसम यासीन शेख याच्या हस्ते स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. दरम्यान तक्रारदार यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली होती. यानुसार हा सापळा लावण्यात आला होता. वरील दोघांना लाच स्विकारण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी प्रोत्साहन दिले असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, सहाय्यक फौजदार मुश्ताक खान, पोलीस काॅनस्टेबल अंकुश आंबेकर, सौरभ महाशब्दे, म.पो.कॉ. पूजा डेरे, चालक सहाय्यक फौजदार दामोदर जाधव, चालक पो.कॉ. चंद्रकांत कदम यांच्या पथकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.