लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तीन्ही सशस्त्र दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी थिएटर कमांड उभरण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या च्या उभारण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सध्या विविध देशातील अशा लष्करी संरचणेचा व्यापक स्थरावर अभ्यास सुरू असून देशाच्या संरक्षण गरजा ओळखुन नवे थिएटर कमांड उभारण्यात येईल अशी माहिती दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी व्यक्त केली.
दक्षिण मुख्यालयाने कोरोना काळात केलेल्या विषेश कामगिरीची माहिती देण्याकरीता आयोजित पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती बोलत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
मोहंती म्हणाले, लष्कर, हवाईदल आणि नौदलात चांगला समन्वय आहे. भविष्यातील मोहिमा चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी थिएटर कमांड स्थापन केले जाणार आहे. या कमांडच्या उभारणीत दक्षिण मुख्यालय समन्वयकाची भूमिका बजावणार आहे.
माेहंती म्हणाले, बदलत्या युध्दप्रणालीमुळे लष्करापुढे अनेक नवीन आव्हाने आहेत. त्यादृष्टीकाेनातून लष्कराचे आधुनिकीकरण सुरू आहे. दक्षिण मुख्यालय हे नवे तंत्रज्ञान स्विकारात आहे. त्या द्वारे अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या माध्यमातून जगातील एक अत्याधुनिक लष्कर म्हणून भारतीय लष्कर स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
दक्षिण मुख्यालया अंर्तगत देशाच्या जमीनीपैकी ४१ टक्के भूभाग आहे. यात ११ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. या भागात माेठी किनारपट्टी असून भविष्यातील सागरी सुरक्षेची आव्हाने पाहता भारतीय नाैदल, तटरक्षकदलासोबत समन्वय राखत सागरी सीमांचे रक्षण करण्यासही कटीबद्ध आहे. यासाेबतच तीन्ही दलांची अॅम्फीबीअस वॉरफेर तंत्रज्ञान (उभयचर युध्द) विकसित करण्यासाठी महत्वाची पावले उचलली जात आहे. भविष्यातील कुठल्याही प्रकारच्या लष्करी आणि नैसर्गिक आवाहनांना सामोरे जाण्यासाठी लष्कराचा दक्षिण विभाग सज्ज आहे असेही ते म्हणाले. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू येथील पुरग्रस्थ आणि चक्रीवादळ या आपत्ती काळात मुख्यालयाच्या जवळपास २ हजार जवानांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
कॅन्टोनमेन्ट बोर्डाची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. कोरोना काळात मिळणार उत्पन्नही कमी झाले. त्यात केंद्राने मंजुर केलेला जीएसटीची रक्कम बोर्डाला न मिळाल्याने आर्थिक विवंचनेत भर पडली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे मोहंती म्हणाले.
चौकट
आत्मनिर्भर भारतासाठी मोलाचे योगदान
संरक्षण उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी संरक्षण विकास आणि संशोधन संस्था(डीआरडीओ)ची महत्वाची भूमिका आहे. त्यांच्या मदतीने आधुनिक युद्ध कौशल्य आणि शस्त्रास निर्मिती करण्यात येत आहे. भविष्यात देशाची शस्त्रास्त्रांची गरज भारतातच भागवण्यासोबतच शस्त्रनिर्यातीसही प्रोत्साहन दिले जाणार आहे. या साठी खाजगी कंपन्यांची महत्वाची भूमिका राहणार आहेत.
चाैकट
सहा हजार लष्करी आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण
काेराेना काळात जवानांची सुरक्षा सांभाळण्या साेबतच नागरिकांची सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिले. यासाठी स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या साह्याने उपाय योजना केल्या.
माेठ्या प्रमाणात विलगीकरण कक्ष उभारण्यासाेबतच लष्कराने तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केले. देशात लसीकरण मोहिम सुरू झाली असून पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. यात लष्कराच्या ६ हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.
लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती होणार उपलष्करप्रमुख
लष्कराचे सध्याचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी येत्या काही दिवसांत निवृत्त होत आहे. त्यांच्या जागी सध्याचे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती हे उपलष्कर प्रमुखाचा पदभार स्विकारणार आहेत.