पुणे : पाषण ते कोथरूड वाहतूक सुरळीत करण्यासोबतच सेनापती बापट रस्त्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित असणाऱ्या पंचवटी, पाषाण ते कोथरूड आणि पंचवटी, पाषाण ते गोखले नगर या दोन्ही बोगद्यांच्या कामाला गती येणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली असून या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी या दोन्ही बोगद्यांच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
या वेळी बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला उपस्थित होते.
याबाबत मोहोळ म्हणाले की, कोथरूड ते पाषाण हे सध्याचे अंतर चांदणी चौकमार्गे साडे आठ किलोमीटर तर सेनापती बापट रोडमार्गे हेच अंतर साडेनऊ किलोमीटर इतके आहे. बोगदा पूर्ण झाल्यावर हेच अंतर चार किलोमीटर इतके होणार आहे. तर पाषाण रोड ते गोखलेनगर हे अंतर सव्वा चार किलोमीटर असून बोगदा झाल्यावर हेच अंतर २.९ किलोमीटर होणार आहे. कोथरूड ते पंचवटी या बोगद्याची लांबी १ हजार ९० मीटर, तर पंचवटी ते गोखलेनगर या बोगद्याची लांबी ५८० मीटर इतकी आहे. या भागातील वाहतुकीमुळे होणारी कोंडी या बोगद्यांच्या कामानंतर निश्चितच कमी होणार आहे.
----
बोगद्यांच्या कामासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. वेळेत काम पूर्ण न केल्याने सल्लागार बदलून नवीन सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. दोन्ही बोगद्यांच्या कामाच्या शासकीय परवानग्या तातडीने मिळण्यास मदत होईल.
- मुरलीधर मोहोळ, महापौर