लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा बोगद्याजवळ डोंगराला जाळ्या लावण्याच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या दगडी भिंतीला बुधवारी सकाळी मुंबईच्या दिशेने साखर घेऊन जाणारा ट्रक धडकल्याने झालेल्या अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर जवळपास तीन ते चार किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने कामानिमित्त बाहेर पडलेले प्रवासी वाहतूककोंडी अडकून पडले.द्रुतगती महामार्गावर पावसाळ्यात दरडी पडण्याच्या काही घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर धोकादायक ठिकाणचे सैल दगड पाडत डोंगराला जाळी लावण्याचे काम खंडाळा घाट व बोगदा परिसरात सुरू आहे. या कामादरम्यान दगड रस्त्यावर येऊ नयेत, याकरिता मुंबई मार्गावरील एक लेन बंद करत दगडी सुरक्षा भिंत उभारण्यात आली आहे. सकाळी साखरेच्या पोत्यांनी भरलेला ट्रक एका कंटेनरचालकाने हूल दिल्याने या भिंतीवर आदळल्याने मुंबई मार्गिकेवरील दुसरी लेनदेखील बंद झाली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. साडेनऊच्या सुमारास सदर अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी वाहतूक रोखली. (वार्ताहर)
द्रुतगती मार्गावर दोन तास कोंडी
By admin | Published: January 21, 2016 1:03 AM