लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशाच्या विकासासाठी विज्ञानाची प्रगती होणे खूप गरजेचे आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांनी नवनवीन आव्हाने स्वीकारली पाहिजेत. विज्ञानाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या गोष्टी कशा घडतात, याचा विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक अभ्यास करावा. भावी पिढीची विचारसरणी तंत्रज्ञानामुळे प्रगत होत आहे. या क्षेत्रात काम करायचे असेल, तर सातत्याने नवनवे मार्ग शोधून अभ्यास करावा, असा सल्ला ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित ८७ व्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेत ‘शास्त्रज्ञांचा विद्यार्थ्यांशी संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. मंजू शर्मा, आयुका पुणेचे संचालक डॉ. सोमकराय चौधरी, प्रा. परमजित कुºहाणा उपस्थित होत्या.या राष्ट्रीय विज्ञान परिषदेस देशभरातून ३०० संशोधन करणारे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. १०० शास्रज्ञांनी यामधे सहभाग घेतला आहे. विज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस खूप वाढत आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात ज्या ज्या घडामोडी घडतात, त्या घडामोडींची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी शास्त्रज्ञांचा विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला होता. या संवादामध्ये विविध शाळांमधील ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.चौधरी म्हणाले, विज्ञानाच्या क्षेत्रात जे लहान लहान बदल होतात, त्या बदलांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. संशोधनातल्या मूळ संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. आकाशगंगा म्हणजे नेमके काय, आकाशामध्ये ज्या आंतरिक हालचाली होतात, त्या कशा होतात, ते पाहिले पाहिजे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. कुराणा म्हणाल्या, भारतामधे कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.भारतामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होताना दिसतो आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाºया विद्यार्थ्यांनी सातत्याने आपली बुद्धी जागृत ठेवली पाहिजे. देशामध्ये लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु उत्पन्न ज्या प्रमाणात वाढायला हवे, त्या प्रमाणात वाढताना दिसत नाही. शेतीच्या क्षेत्रामध्ये भारत नव्या तंत्रज्ञान वापराच्या बाबतीत कमी पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. डॉ. मोडक यांनी सूत्रसंचालन केले, तर दीपाली मालखेडे यांनी आभार मानले.
आव्हाने स्वीकारा; मोठे व्हाल - अनिल काकोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 3:39 AM