पुणे : पुणे प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)चा विकास आराखडा (डीपी) तयार करण्याची घोषणा करण्यात आली असून, सध्या वापरात असलेल्या जमीनीचे (ईएलयू) नकाशे बनविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. परंतु, पीएमआरडीएच्या क्षेत्रातील सीमेवरील ज्या गावांना अद्याप गावठाण दर्जा नाही, त्यांना गावठाण दर्जा मिळावा, या संदर्भातील सूचना करण्याची संधी दिली आहे.महापालिकेमध्ये गावे समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही गावांना ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला; परंतु गावठाण दर्जा मिळालेला नव्हता. त्यामुळे या गावांमध्ये टेकडीफोड करून नियमबाह्य अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. त्यातच ‘शून्य टक्का’ गावठाण दर्जाबाबत काही गावांची जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर सुरू असेलेली प्रकरणे पीएमआरडीएकडे वर्ग करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील महापालिका, नगर परिषदा व सात तालुक्यांमधील गावे वगळून पीएमआरडीएला इतर क्षेत्रांमधील बांधकाम परवानगी, जोते तपासणी, आराखडा मंजुरी अशा आवश्यक परवानग्या देण्याचे अधिकार आहेत.पीएमआरडीएने निश्चित केलेल्या क्षेत्रांच्या सीमारेषेलगतच्या जमिनींवरील सद्य:स्थितीमध्ये बांधकाम असेल. परंतु, त्या ठिकाणी हरित क्षेत्र असल्यास त्यांना रहिवासी क्षेत्र करण्याची सूचना देण्याची मुभा असेल. तसेच गावठाण दर्जा, क्रीडांगण, शाळा, सांस्कृतिक केंद्र, गृहप्रकल्प योजनांबाबतदेखील सूचना नोंदविता येणार आहे. पीएमआरडीएच्या मुख्य कार्यालयामध्ये नागरिकांना नकाशे पाहण्यास उपलब्ध असून येत्या दोन महिन्यांत नागरिकांच्या हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत.
गावठाण दर्जाच्या सूचना स्वीकारणार
By admin | Published: June 22, 2017 6:59 AM