पुणे :“ संयम, चिकाटी,धैर्य, शिस्तबद्धता, कामात झपाटणे, विश्लेषणात्मकता, संशोधनात्मवृत्ती, प्रतिभा आणि वकृत्व कलासारख्या गुणांना विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात उतरावावे. तसेच ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग हे सूत्र कायम लक्षात ठेवावेत.” असा सल्ला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्व शांती विद्यापीठातर्फे कीर्तनकार, प्रज्ञाचक्षु ह.भ.प. गणपत महाराज जगताप यांना डी.लिट(डॉक्टर ऑफ लेटर्स) ही सन्माननीय पदवी प्रदान केली. तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. यावेळी ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड , विद्यापीठाचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे आणि कुलसचिव डॉ. प्रशांत दवे उपस्थित होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,“ गणपत महाराज हे नेत्रहीन असूनही त्यांनी समाजाला आणि या देशाला दृष्टी दिली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी हे सिद्ध केले. तसेच, बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासून शिवचरित्राशी एकरूप होऊन तपश्चर्या केली. अशा महान व्यक्तीच्या सर्व गुणांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“ संतांच्या ग्रंथांचे अध्ययन करणे जीवनात महत्वाचे आहे.त्यांने जीवनाचा उध्दार होतो. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने ह.भ.प.जगताप महाराज यांना डी.लिट. बहाल करून नया पायांडा घातला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजाचे कार्य युवकांच्या मनामनात पेरले आहे.
गणपत महाराज म्हणाले,“ प्रतिकुल परिस्थितीमध्ये असतांनाही मला विद्यापीठाकडून पदवी बहाल करण्यात आली आहे. समर्थाच्या मनात आल्यावर सर्व काही सिद्ध होते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले“ सर्वांनी शिवचरित्राचे सतत चिंतन आणि मनन करावे. ते आपल्या कणाकणात भिणविण्याचा प्रयत्न करावा. कोणाचाही कधी द्वेष आणि राग करू नका. सर्वांवर प्रेम करा हा शिवचरित्राचा संदेश आहे.”
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले.“सद्गगुणांची पूजा हीच ईश्वराची पूजा. प्रज्ञाचक्षू गणपत महाराज जगताप यांना डी.लिट ही पदवी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या हेतूने हा सन्मान करण्यात आला आहे.
डॉ.एन.टी.राव यांनी प्रास्ताविक केले. प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन तर डॉ. प्रशांत दवे यांनी आभार मानले.