लोकमत न्यूज नेटवर्कपारवडी : येथील परिसरातील ओढा, नवीन बंधाऱ्यात ग्रामपंचायतीच्या मागणीशिवाय खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा पाणी सोडले. ठराविक बड्या बागायतदारांकडून लाच घेऊन पाणी सोडल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकारची चौकशी करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत येथील ग्रामस्थ सचिन होले यांनी सांगितले की, माझा पाण्याअभावी तीन एकर ऊस जळून गेलेला आहे. याबाबत आम्ही काही शेतकऱ्यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी करूनदेखील शेतीला पाणी दिले नाही. मात्र, गावातील ओढ्यात पाणी का सोडले, याबाबत खडकवासला पाटबंधारे विभाग इंदापूर शाखेचे अभियंता के. के. देवकाते यांना संपर्क साधला असता, पारवडी ग्रामपंचायतीने पाणी सोडण्याची मागणी केल्यामुळे पाणी सोडल्याचे सांगितले. परंतु, पारवडीचे ग्रामसेवक शहानूर शेख यांनी आम्ही खडकवासला पाटबंधारे विभागात पाणी सोडण्याची मागणी केली नसल्याचे सांगून याबाबत मला काहीही माहीत नसल्याचे सांगितले. मागील आठवड्यापासून इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावात खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले होते, तर दुसरीकडे याच कालव्यातील पाणी पारवडीच्या बंधाऱ्यात संबंधित विभागातील अधिकारी लाच स्वीकारत सोडत आहेत. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
लाच स्वीकारून बंधाऱ्यात सोडले पाणी?
By admin | Published: May 06, 2017 1:59 AM