किमया बोराळकर
पुणे : पौगंडावस्थेत आल्यानंतर शरीरात हाेणारा बदल जाणवू लागला. इतर मुलांपेक्षा वेगळे आहोत हे कळू लागले आणि ‘ताे’ प्रचंड मानसिक तणावात गेला. अंधाऱ्या खोलीत स्वतःला कोंडून घेतले. गुदमरलेपण असह्य झाल्याने ताे दहावीत असताना आत्महत्येचाही प्रयत्न केला. महाविद्यालयात गेल्यावर एक स्वच्छंदी जगणारा मित्र त्याच्या आयुष्यात आला आणि संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली. वस्तुस्थिती स्वीकारली आणि आयुष्यात रंग भरत गेला. ही कहाणी आहे पुण्याच्या कसबा पेठेतील प्रीतेशची.
आजही आपण प्रगत झाल्याच्या गप्पा करत असलाे तरी गे चाइल्ड म्हणून ॲक्सेप्ट करणे कठीण आहे. आजही समाजात खूप न्यूनगंड बाळगला जातो; परंतु वास्तव स्वीकारले तर चांगले घडू शकते. आपला मुलगा जसा आहे तसा स्वीकारणे हे फार धाडसाचे काम आहे. ताे धाडस दाखवला पाहिजे. तो प्रीतेशच्या आई-वडिलांनी दाखवला. हाच धडा इतरांनी घेतला पाहिजे.
प्रीतेशची आई सरकारी नोकरीला असल्याने वडिलांनीच संपूर्ण सांभाळ केलेला. शाळेत गेल्यानंतर आपण इतर मुलांपेक्षा वेगळे आहोत, हे कळायला लागल्यानंतर ताे प्रचंड मानसिक तणावात गेला हाेता. अंधाऱ्या खोलीत स्वतःला कोंडून घेत असे. बाहेरील ऊनदेखील सहन होतं नव्हते. या त्रासामुळे दहावीत असताना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घरचे जरा भानावर आले. तातडीने लक्ष दिल्याशिवाय पर्याय नाही हे जाणवले. ते प्रीतेशला समुपदेशकाकडे घेऊन गेले. मुलाला समजून घेऊ लागले.
पुढे ताे महाविद्यालयात गेल्यानंतर त्याच्या सारखाच एक मुलगा त्याला गरवारे कॉलेजमध्ये भेटला. जो मुलींप्रमाणे तयार झाला होता. लिपस्टिक लावले हाेते. कानात दागिने घातले हाेते. हा व्यक्ती किती स्वतंत्र जगत आहे आणि आपण स्वतःला इच्छा नसताना पुरुषाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न का करत आहोत, असा प्रश्न प्रीतेशला पडला. ज्यात आपली प्रचंड घुसमट होत आहे. पुढे फेसबुकच्या माध्यमातून त्याला गाठले. आपल्याला वाटणाऱ्या फिलिंग काही गुन्हा नाही, ते सामान्य आहे. सेक्सुअल ओरिएंटेन्शन ही संकल्पना पहिल्यांदा प्रीतेशने ऐकली. आणि त्याचा स्व:चा शोध सुरू झाला.
प्रीतेशचा स्वतःबद्दल शोध घेण्याचा प्रवास इथून सुरू झाला. त्यानंतर अनेक प्रसंग आले, ज्यातून छोट्या छोट्या गोष्टी उलगडत गेल्या. अखेर ‘स्व’चा शोध लागल्यानंतर वेळ आली ती घरी आई-बाबांना खरी ओळख सांगण्याची. प्रीतेशच्या मनात थोडी धाकधूक होती. घरचे कशा पद्धतीने घेतील, त्यांचे मन सत्य पचवू शकतील का, असे नाना प्रश्न त्याच्या मनात येत होते. शेवटी संपूर्ण तयारी करून मोठं धाडस करून त्याने घरी आई-बाबांना सत्य सांगितले. ते पचवण्यासाठी एक रात्र गेली. घरात संपूर्ण शांतता; पण दुसऱ्या दिवशी प्रीतेशच्या आई-वडिलांनी प्रीतेशला आहे तसा स्वीकारला. आज अशी परिस्थिती आहे की प्रीतेशची आई आत्मविश्वासाने सांगते की, हो माझा मुलगा गे आहे. नातेवाइकांनी लग्नाबद्दल विचारल्यावर ‘हो, बघा ना प्रीतेशसाठी मुलगा’ असे म्हणते. प्रीतेशच्या आईचा हा आत्मविश्वास प्रत्येक पालकाने अनुकरण करण्यासारखा आहे. आज प्रीतेश स्वतंत्रपणे जगतो आहे, आपली ओळख न लपवता. पुण्यातील एका एनजीओमध्ये आनंदाने समलैंगिक युवकांच्या प्रश्नावर खूप छान काम करत आहे.