पुणे : वीज मीटरची क्षमता वाढवून देण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपतप्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी येरवडा उपविभागीय कार्यालयात ही कारवाई केली. गिरीश नारायण भगत (वय ४२) असे या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी २५ वर्षीय विद्युत ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. विद्युत जोडची क्षमता वाढवून देण्यासाठी येरवडा येथील उपविभागीय कार्यालयात एका ग्राहकाची फाईल तक्रारदार यांनी सादर केली होती. या फायलीला मंजुरी देण्यासाठी भगतने २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १८ हजार रुपये स्वीकारताना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास येरवडा येथील उपविभागीय कार्यालयात भगतला रंगेहाथ पकडण्यात आले. याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच स्वीकारताना अभियंता गजाआड
By admin | Published: July 08, 2016 4:16 AM