पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांनी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांपासून अकरावी प्रवेश आॅफलाइन पध्दतीने प्रवेश न करता आॅनलाइन पध्दतीने प्रवेश करावेत, असे आदेश शासनातर्फे देण्यात आले होते.मात्र,शहरातील 6 कनिष्ठ महाविद्यालयांनी शासनाचे आदेश डावलून आॅफलाइन पध्दतीनेच प्रवेश दिले केल्याची माहिती समोर आली आहे.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे सर्व अल्पसंख्यांक महाविद्यालयांना अकरावीचे प्रवेश आॅनलाइन पध्दतीने करावेत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांकडून या आदेशाची अंमलबजावणी केली जाते किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने १२ कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी दिल्या. त्यातील ६ अल्पसंख्याक महाविद्यलायांनी आॅफलाइन पध्दतीने प्रवेश केल्याचे समोर आले, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सांगितले. त्यातील काही महाविद्यालयांनी आपला अल्पसंख्यांक कोटा सरेंडर केला असून काहींनी बोटावर मोजण्याएवढे प्रवेश आॅफलाइन केले असल्याचेही जाधव यांनी नमूद केले.-अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेश आॅनलाइन पद्धतीने करावेत, असे स्पष्ट करूनही आॅनलाइन पद्धतीने प्रवेश करून शासनाचे आदेश डावलणाऱ्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांचा ‘अल्पसंख्याक दर्जा ’काढून घेण्याबाबत राज्याच्या अल्पसंख्याक मंत्र्यांना कळविले आहे,असे राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.तथ्यहीन तक्रारींकडे लक्ष देणार नाही : तावडे अकरावी प्रवेशप्रक्रियेबाबत पालकांकडून प्राप्त झालेल्या, योग्य तक्रारींची दखल घेऊन त्याची चौकशी केली जाईल. मात्र, दर वर्षी काही व्यक्ती व संस्था प्रवेशाबाबत तक्रारी करतात. त्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य नसते. त्यामुळे अशा तक्रारींचा विचार केला जाणार नाही, असेही विनोद तावडे म्हणाले.त्यामुळे विनाकारण प्रवेश प्रकियेवर दोषारोप करणाऱ्या व्यक्तींची दखल घेणार नसल्याचे तावडे यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे.
शहरातील ६ अल्पसंख्याक कॉलेजचे प्रवेश आॅफलाइन
By admin | Published: June 21, 2015 12:21 AM