रांजणगाव गणपती : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. आता या देवीच्या मंदिरामध्ये ‘वेस्टर्न’ कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना ‘एन्ट्री’ बंद करण्यात आली आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने मंदिर परिसरात संस्थानच्या वतीने परिसरात फलक लावण्यात आले आहेत. जे भाविक अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशाेभनिय (वेस्टर्न) तसेच हाफ पॅन्ट व बरमुडा परिधान करून येतील, त्यांना श्री तुळजाभावानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. निर्णयाची चाेख अंमलबजावणी व्हावी, यासाठी तातडीने मंदिर परिसरात याबाबतचे फलकही लावले आहेत. त्यानंतर रांजणगावच्या श्री महागणपती मंदिराबाबतही अशा आशयाचे पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. परंतु याबाबतचा कोणताही निर्णय देवस्थानने घेतला नसल्याचे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.
शिरूर तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिरात राज्यातून लाखो भाविक येत असतात, संकष्टी चतुर्थीलाही मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्याने भाविकांमध्ये चर्चा सुरु होती. अखेर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने चर्चेला पूर्णविराम देत स्पष्टीकरण दिले आहे.
रांजणगावचा श्री महागणपती देवस्थानच्या वतीने कुठल्याही आशयाचे फलक अधिकृतरीत्या लावलेले नाहीत. देवस्थानच्या अधिकृत संकेस्थळावर कुठेही अशा पोस्ट नाहीत. मात्र हे रांजणगाव गणपती हे अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असून श्री महागणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी पूर्वीपासून चालत आलेल्या धार्मिक प्रथा परंपरेचे पालन करून श्री महागणपतीचे दर्शन घ्यावे. मंदिरात प्रवेश करतांना भाविकांनी कृपया भारतीय संस्कृतीचा आदर करावा असे आवाहनही श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.