वारजे : वारज्यात कालच्या पीएमपी ब्रेक फेलची घटना ताजी असताना आज शुक्रवारी एका डांबरचे मिश्रण घेऊन जाणार्या वाहनांचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात एक महिला गंभीर झाली आहे. तर दुचाकी चालवणारा त्यांचा मुलगा थोडक्यात बचावला.कौशल्या दत्तात्रय मोहोळ (वय ५०, रा. बहुली) असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शिवणे उत्तमनगर भागात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या जोरात चालू आहे. त्याच कामासाठी हा डांबर मिक्स करणारा टेम्पो उत्तमनगरच्या दिशेने जात असताना शिंदे पुलावर टेम्पोचा ब्रेक फेल झाला. या भागात वाहनांची गर्दी असल्याने अवाढव्य वाहनावर चालकाला ताबा मिळवता न आल्याने हा टेम्पो गर्दीत घुसला. यात दुचाकीवर मागे बसलेल्या कौशल्या या टेम्पोच्या खाली गेल्याने त्यांना जबर मार लागला. अपघातस्थळी नागरिकांनी त्यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेची वाट न पाहता शाळेच्या विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनाने नजिकच्या खासगी रुग्णालयात पाठवले. जखमींना मदत करण्यासाठी व अपघातस्थळी वाहतूककोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलीस व उत्तमनगर पोलिसांना स्थानिक कार्यकर्त्यांनीदेखील मोठी मदत केली. यात नगरसेवक सचिन दोडके, कुणाल दांगट, प्रवीण दांगट, अतुल दांगट, हरिष मुनोत, राकेश पोखरणा, विष्णुपंत देशमुख, सागर जावळकर, रामालाला जैन आदींनी सहकार्य केले. यावेळी रस्त्यात अडकलेल्या टेम्पोला क्रेनच्या साह्याने पोलीस व नागरिकांनी बाजूला घेतले. या घटनेत दुचाकीचालकास किरकोळ मार लागल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली. दरम्यान सलग दोन दिवस ब्रेक फेल होऊन व नेमका रस्त्याच्या उतारावर अपघात घडल्याने वारजे भागात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.