Shivswarajya Yatra : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसन्मान यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार महाराष्ट्रभर फिरणार आहेत. नाशिकच्या दिंडोरीतून अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली. शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत नेण्यासाठीच नाशिकच्या पावन भूमीतून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनसन्मान यात्रा काढण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील महाराष्ट्र पिंजून काढण्याचं ठरवलं आहे. शरद पवार गटाकडून देखील शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आलंय. मात्र यात्रेच्या सुरुवातीलाच मोठा अपघात होता होता वाचला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून 'शिवस्वराज्य' यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरी किल्ल्यापासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. मात्र यात्रेच्या सुरुवातीलाच मोठा अपघात टळला. शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून खासदार अमोल कोल्हे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. यावेळी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हे शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. मात्र याचवेळी एक विचित्र अपघात घडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यादरम्यान जयंत पाटील उभे असलेली ट्रॉली अचानक कलंडली.
शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घातल्यासाठी एका क्रेनला लोखंडी ट्रॉली जोडण्यात आली होती. या ट्रॉलीमध्ये जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे आणि मेहबुब शेख हे चौघे उपस्थित होते. उंच पुतळ्याला हार घातल्यानंतर ट्रॉली खाली घेण्यात येत होती. मात्र खाली येत असतानाच ट्रॉली हवेतच एका बाजूला कलंडली. ट्रॉली एका बाजूला गेल्याने चौघांचाही तोल गेला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी मोठा अपघात टळला आहे.