लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी (दि.२१) लागलेली आग म्हणजे अपघात होता की घातपात यावर आत्ता भाष्य नको. तपास पूर्ण होऊ द्या, अहवाल येऊ द्या,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. या घटनेत पाच दुर्दैवी मृत्यू झाले हे खरे असले तरी कोविशिल्डच्या उत्पादनात बाधा आलेली नाही. तसेच कोविशिल्डच्या साठ्यालाही धक्का लागलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत शुक्रवारी (दि.२२) दुपारी मांजरी येथील ‘सिरम’ला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ‘सिरम’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला, सीईओ आदर पूनावाला, राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी यावेळी उपस्थित होते.
कोविशिल्ड लसीकरणाचे काय होणार याबद्दल शंका होती. मात्र मला दिलेल्या माहितीप्रमाणे कोविड लस जिथे बनवली जाते ते केंद्र अंतरावर आहे. तिथे कोणतीही दुर्घटना घडलेली नाही, असे ठाकरे म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. अहवाल येईपर्यंत निष्कर्ष काढायला नको. मृत्यू झालेल्यांची संपूर्ण जबाबदारी ‘सिरम’ने घेतली आहे. आवश्यकता पडल्यास सरकारही मदत करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे यांनी सांगितले की, आगीची बातमी आल्याने क्षणभर सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. दुर्दैवाने पाच मृत्यू झाले. परंतु, जिथे लस उत्पादन होते, उत्पादीत लसीचा साठा जिथे केला जातो तिथे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. दुर्घटना घडली तिथले पहिले दोन मजले वापरात आहेत. त्यावरच्या मजल्यांवर नवे केंद्र सुरू होणार होते तिथे दुर्घटना घडली.
डॉ. सायरस पूनावाला म्हणाले, “आग लागलेल्या इमारतीत लस उत्पादन सुरू झाले नव्हते. इतर इमारतींमध्ये आग लागली असती तर नुकसानीची तीव्रता प्रचंड वाढली असती.”
चौकट
हजार कोटींचे नुकसान
“नव्या प्रकल्पाला गुरुवारी आग लागली. यात एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी बीसीजी आणि रोटाव्हायरस लसीचे उत्पादन होणार होते. या दृष्टीने यंत्रसामुग्री बसवण्याची व अन्य कामे चालू होती. खूप नशिबवान ठरलो की, उत्पादनाच्या अन्य अनेक फॅसिलिटी असल्याने कोविड-१९ वरील लस उत्पादनावर कोणताही परिणाम झालेला नाही.”
- आदर पूनावाला, सिरम इन्स्टिट्यूट