लोकमत न्यूज नेटवर्कचाकण : कावासाकी मोटारसायकलला पाठीमागून कंटेनरची जोराची धडक बसल्याने चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावर चाकण गावाच्या हद्दीत रविवारी (दि. ६) सायंकाळी सहाच्या दरम्यान झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले.दैव बलवत्तर म्हणून या अपघातात तीन वर्षांची चिमुरडी बालंबाल बचावली असून, ती किरकोळ जखमी झाली आहे. अधिक उपचारासाठी तिला येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले असून, तिथे तिच्यावर तातडीचे उपचार सुरू आहेत. पंडित चिमाजी गोपाळे (वय ४१) व त्यांची पत्नी आशा पंडित गोपाळे (वय ३५, दोघेही रा. आडगाव, ता. खेड) असे या अपघातात जागीच ठार झालेल्या दुचाकीवरील पती- पत्नीची नावे आहेत. तर त्यांची तीन वर्षांची चिमुरडी विकिता पंडित गोपाळे ही या अपघातात किरकोळ जखमी झाली आहे. बबन बाबूराव गोपाळे (वय ५६, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गोपाळे हे रविवारी तळेगाव चौकातून चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्याने मोटारसायकलवरून जात होते. अगदी त्याच वेळेस त्यांच्या पाठीमागून सद्दाम हुसेन सफी खान (वय ४६, रा. राजस्थान) हा कंटेनर (एच.आर. ५५, ए.बी.१७७७) भरधाव वेगात घेऊन निघाला होता. दुचाकीला पाठीमागे टाकण्याच्या प्रयत्नात दुचाकीलाच त्याच्या ताब्यातील कंटेनरची पाठीमागून जोरात धडक बसून हा विचित्रअपघात झाला.बेपर्वा चालकाला नागरिकांनी पकडलेहा अपघात इतका भीषण होता की, या अपघात दुचाकीचालक पंडित गोपाळे व त्यांच्या पाठीमागे दुचाकीवर बसलेली त्यांची पत्नी आशा गोपाळे हे दोघे पती - पत्नी जागीच ठार झाले.मात्र, सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून दुचाकीवरील त्यांची तीन वर्षांची विकिता ही चिमुरडी किरकोळ जखमी होऊन बालंबाल बचावली. तिला अधिक उपचारासाठी येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, तिथे तिच्यावर तातडीचे उपचार सुरू आहेत.या अपघातात दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला असून, या घटनेनंतर कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या सद्दाम सफी खान याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
अपघातात पती-पत्नी ठार, तीन वर्षांची चिमुकली बचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 2:52 AM