ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 15- गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करणाऱ्या तळेगाव दशासर पोलिसांच्या गाडीचा चांदूर रेल्वेलजवळ अपघात झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. वाहन चालक हेड कॉन्स्टेबल बाबाराव पाटील व कॉन्स्टेबल पवन महाजन अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार. देवगाव चौफुलीवरून गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकची माहिती मिळाल्यावर बाबाराव पाटील व पवन महाजन यांनी पोलीस जीप घेऊन ट्रकचा पाठलाग सुरू केला. भरधाव असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र चांदूर रेल्वे नजीकच्या देवीच्या मंदिराजवळील वळणावर पोलिसांची जीप अनियंत्रित झाली व रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात चालक बाबाराव पाटील यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तर पवन महाजन हेदेखील गंभीर जखमी आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती स्थिर आहे.
तळेगाव पोलिसांच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरून रेती व गोवंशाची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेकदा या मार्गावर पोलीस कारवाई केल्यानंतरही ट्रक चालक कुणालाच जुमानत नसल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे.