लोणावळा : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळील देवले व औंढे पुलादरम्यान अशोका ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसची पुढे जात असलेल्या आयशर टेम्पोला जोरात धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील २३ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी ११ प्रवासी गंभीर जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बसमध्ये एकूण ३६ प्रवासी होते. हा अपघात गुरुवारी पहाटे पाचच्या वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
आशिया अयाज तांबोळी (वय-४५, रा.सांगली), फुलाबाई श्रीकांत काळे (वय-६५, रा. मुंबई), बसचालक,दिनकर डोंगरे (वय-५०), सहायक चालक विशाल माने (वय-२५), संजय श्रीकांत काळे (वय-४०), संजय शिवाजी भोसले (वय-५०), मंगल सुरेश सुतार (वय-६०), अमोल रामचंद्र पाटील (वय-३१), प्रिया सुशांत सुतार (वय-३४), वैभव रघुनाथ जाधव (वय-२५), शुभम हेमंत चिमगावकर (वय-२०), दिपक प्रकाश गायकवाड (वय-४८), किरण बाळासाहेब काळे (वय-४९), सईबाई जयराम शेळके (वय-३६), कुमार राजमोहम्मद शेख (वय-२५), पृथ्वी संजय देवकाते (वय-२५), प्रणित गणेश मोरे (वय-२५, सर्व रा. कोल्हापूर), संतोष जगन्नाथ राऊत (वय-४९, धनकवडी, पुणे),जिग्नेश रमेश शहा (वय-४९, रा.गुजरात), नविना अतुल पाटोळे (वय-२३), अतुल बबन पाटोळे (वय -३०, दोघेही रा. नेरूळ), सुनिता सुभाष पोळ (वय -५५, रा. भांडूप, मुंबई), स्वप्निल हरिंद्रसिंह सोदी (वय-३४, रा.ठाणे) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून बोरिवलीला प्रवासी घेऊन जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्सच्या बस (क्रमांक -एमएच-५१/सी-०९०९) च्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस पुढे जात असलेल्या एका अज्ञात आयशर टेम्पोला मागून जोरात धडकून हा अपघात झाला. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाल्याने बसमधील २३ प्रवासी जखमी झाले असून, यापैकी ११ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक विजय शेटे, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत आवारे, पोलिस हवालदार विजय गाले, सिताराम बोकड व दोन्ही पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह देवदूत आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची पहाणी करत पोलिसांनी देवदूत आपत्कालीन पथकाच्या मदतीने बसमधील सर्व जखमींना तत्काळ उपचारासाठी सोमाटणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर किरकोळ जखमींना घटनास्थळी उपचार करण्यात आली. त्यानंतर अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.