पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालये, विभाग व संस्थांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशासनाकडून अपघात विमा उतरविण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्याचा अपघात होऊन तो जखमी झाल्यास त्याला ५० हजारांची, कायमचे अपंगत्व आल्यास १ लाखांची मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना १ लाख रूपयांची मदत केली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांसाठी ही अपघात विमा योजना राबविली जात आहे. अपघात योजनेचा आढावा घेण्यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, वित्त व लेखाधिकारी विद्या गारगोटे, आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत दुधगावकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांची समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सद्यस्थितीमध्ये वैद्यकीय खर्चाचा विचार करता विद्यार्थ्यांना औषधोपचाराच्या विमा रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याचा ५ हजार रूपयांचा विमा उतरविला जात होता. त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी विमा संरक्षण योजनेमध्ये ५० विद्यार्थ्यांना या अपघात विमा योजनेअंतर्गत मदत करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांवर अपघात, दुर्घटना यामुळे एखादी आपत्ती कोसळल्यास त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होऊ नये या हेतूने विद्यार्थी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर यंदाच्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी या योजनेचे अधिक सुलभीकरण करण्यात आल्याचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रभाकर देसाई यांनी सांगितले आहे.
अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना मिळणार ५० हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 7:40 PM
विद्यार्थ्याचा अपघात होऊन तो जखमी झाल्यास त्याला ५० हजारांची, कायमचे अपंगत्व आल्यास १ लाखांची मदत केली जाणार आहे.
ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : सर्व महाविद्यालयांना मिळणार योजनेचा लाभ मागील वर्षी विमा संरक्षण योजनेमध्ये ५० विद्यार्थ्यांना या अपघात विमा योजनेअंतर्गत मदत