पुणे : एफटीआयआयच्या २०१३ च्या सिनेमॅटोग्राफीच्या शेवटच्या वर्षातील दोन विद्यार्थी डिप्लोमा फिल्म शूट करत असताना २२ फुटावरून खाली पडून गंभीररित्या जखमी झाले. दिवेआगरच्या शेरवाडी गावामध्ये ही घटना घडली. यामध्ये एकाचा पाय तुटला असून, एकाच्या डोक्याला गंभीर मार बसला आहे. त्यांच्यासह दोन लाईट बॉ़य देखील जखमी झाले आहेत. या चौघांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संस्थेच्या प्रशासनाने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्याने ही गंभीर घटना घडली असून, याला कुलसचिवांसह सिनेमँटोग्राफीचे विभागप्रमुख प्रसन्नकुमार जैन जबाबदार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान,विद्यार्थ्यांना योग्य ते उपचार मिळणे हा आमचा पहिला प्राधान्यक्रम असेल, त्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेतल्यानंतरच ही घटना कशी घडली हे कळेल. पण जर निकृष्ट दर्जाचे साहित्य असेल तर त्याची नक्कीच चौकशी केली जाईल असे संचालक भूपेंद्र कँंथोला यांनी सांगितले. या घटनेमध्ये सतीशकुमार, अनुज उजावणे हे दोन विद्यार्थी आणि ला़ईट बॉ़य गंभीर जखमी झाले आहेत. एफटीआयआयच्या २०१३ बँचचे विद्यार्थी शेवटच्या वर्षात महत्वपूर्ण असलेली डिप्लोमा फिल्म शूट करण्यासाठी दिवेआगरला गेले आहेत. त्यांना प्रशासनाकडून भाडेतत्वावर शुटिंगसाठी आवश्यक असे काही साहित्य देण्यात आले आहे. मात्र हे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात २०१३-१६ आणि १७ बँचच्या विद्यार्थ्यांनी कुलसचिवांसह विभागप्रमुख,प्रॉडकशन विभागाकडेही तक्रार केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. विक्रेत्याकडून कमी पैशात साहित्य घेण्याच्या वृत्तीमुळे विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरावी लागत आहे. ही घटना घडविल्याचे प्रशासन कार्यालयाला कळविल्यानंतर साहित्य निकृष्ट दर्जाचे माहीत असूनही का वापरले? असा प्रतिप्रश्न करण्यात आला असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
एफटीआयआयच्या दोन विद्यार्थ्यांना शूट करताना अपघात : २२ फूटांवरुन खाली पडून जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 6:32 PM
दिवेआगरच्या शेरवाडी गावामध्ये सिनेमॅटोग्राफीच्या शेवटच्या वर्षातील दोन विद्यार्थी डिप्लोमा फिल्म शूट करत असताना २२ फुटावरून खाली पडून गंभीररित्या जखमी झाले.
ठळक मुद्देएकाचा पाय तुटला असून, एकाच्या डोक्याला गंभीर मार संस्थेच्या प्रशासनाने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्याने ही गंभीर घटना घडली असल्याचा आरोप २०१३-१६ आणि १७ बँचच्या विद्यार्थ्यांनी कुलसचिवांसह विभागप्रमुख विभागाकडेही तक्रार