कोंढवा : येवलेवाडी येथील काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात झाला. यामध्ये चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तर एका कामगारावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
पवन रामचंद्र कुमार (वय ४०), धमेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०), विकास प्रसाद गौतम (वय २३), अमित शिवशंकर कुमार (वय २७ सर्व रा. येवलेवाडी मूळ- उत्तरप्रदेश) अशी मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. घटनेत मोनेसर कोळी (वय ३१) आणि जगतपाल संतराम कुमार (वय ४१) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन जखमींना रूग्णालयात दाखल केले. जगतपाल कुमार या कामगाराची प्रकृती चिंताजनक असून मोनेसर कोळी या कामगारावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित इंडिया ग्लास सोलुशन ही कंपनी हुसेन तय्यबअली मिठावाला यांच्या मालकीची असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
येवलेवाडी येथे दुपारी एक ते दीडच्या दरम्यान एका काचेच्या कारखान्यात माल उतरताना काचा फुटल्याने सहा कामगार अडकल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्व कामगारांना गंभीर अवस्थेत बाहेर काढून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु त्या सहा कामगारांपैकी चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे ससून रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असून एका कामगारावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
येवलेवाडी येथील भागात अनेक कंपन्या असून अधीकहुन कंपन्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे."इंडिया ग्लास" या काचेच्या कंपनीत आजची ही दुर्घटना घडली असून सदरील कामगार यांच्याबाबत कंपनीने कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. येवलेवाडीतील काचेच्या कारखान्यातील माल उतरवताना अपघात झाला त्यात चार कामगारांचा मृत्यू परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
सदरील कामगारांकडे हॅन्ड ग्लोज, शूज, कोणत्याही प्रकारचे सेफ्टी किट आढळून आले नाही. आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, अशा अनेक राज्यातून येवले वाडी येथील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामगारांची भरती केली जाते, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची "सेफ्टी" कंपन्यांकडून दिली जात नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. चंदन ग्लास ( येवलेवाड़ी ), सफायर ग्लास ( येवलेवाड़ी ), भोरेखान ग्लास ( कोंढवा ) या व अशा अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या कोंडवा येवलेवाडी भागात असून सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याचे चित्र पाहावयास मिळते.
सदर घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले. त्यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला असून इतर कामगारांना दवाखान्यात दाखल केले आहे. घटना का व कशी घडली याचा तपास सुरू आहे. - विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन
सदर घटनास्थळी काच उतरवत असताना काचा असलेले बॉक्स अंगावर पडुन त्याखाली कामगार अडकले होते.क्रेन च्या साह्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर कामगारांना बाहेर काढून हॉस्पिटल मध्ये रवाना केले.त्यामधे 4 कामगारांचा मृत्यू झाला असून दोन जणांची जणांची प्रकृती गंभीर असून एक इसम जखमी आहे.- समीर बशीर शेख, स्टेशन ड्युटी ऑफिसर, अग्निशामक दल