रांजणगाव गणपती (पुणे) :पुणे - नगर महामार्गावरील रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील एमआयडीसीजवळील राजमुद्रा चौकात एका खासगी बसच्या धडकेत दुचाकीवरील कामगारांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी दिली.
कंपनी कामगार राजेंद्र सुरेश पाटील (३२, सध्या रा. रांजणगाव एमआयडीसी, मूळ रा. नवगाव, ता.अमळनेर, जि.जळगाव) असे या अपघातात मृत्युमुखी पडले. एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला असलेले पाटील हे मंगळवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास कामावरून सुट्टी झाल्याने दुचाकीने आपल्या घरी जात असताना रांजणगाव एमआयडीसी येथील राजमुद्रा चौकात त्यांना खासगी बसने धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत या अपघाताला कारणीभूत ठरलेली बस ताब्यात घेतल्याचे रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.