लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सारिका पानसरे यांनी त्यांच्याकडे असलेले शासकीय वाहन प्रशासनाची परवानगी न घेता जिल्ह्याबाहेर वापरले. एवढेच नाही तर या वाहनाला मोठा अपघात झाला. या घटनेची माहिती गेल्या दीड-दोन महिन्यात जिल्हा परिषद प्रशासनाकडे रीतसर लेखी दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या बाहेर त्यांचे शासकीय वाहन घ्यायचे असेल तर अध्यक्षांची परवानगी घेणे आवश्यक असते. समाज कल्याण सभापती यांनी विवाह समारंभसाठी नगर जिल्ह्यात शासकीय वाहन जिल्ह्याबाहेर नेले. शासकीय वाहनचालक नव्हता. खाजगी वाहनचालकाला नेले. वाहनाला अपघात झाला. त्यामध्ये एक जण दगावल्याची माहिती आहे.
जानेवारी महिन्यात घडलेल्या या संपूर्ण घटनेची किंवा अपघाताची माहिती सभापती कार्यालयाने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे दिलेली नाही. अथवा संबंधित गाडीच्या शासकीय वाहनचालकाने देखील त्याची नोंद जिल्हा परिषदेकडे केली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधितांना पत्र पाठवून याबद्दल विचारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.