पुणे, दि. 27 - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पूजेचे साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून सोमाटणे फाट्याकडे जात असताना दुचाकीला भरधाव एसटी बसची पाठीमागून जोरात ठोकर बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे मित्र ठार झाले.
हा अपघात जुन्या पुणे -मुंबई महामार्गावरील तळेगाव खिंडीतील विजय मारूती मंदिरानजीक रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला.सिद्धाराम मलाप्पा बंदिछोडे (वय २१ ,रा.खंडोबा माळ, संभाजीनगर,तळेगाव दाभाडे,मूळ रा. हत्तीकणबस,ता.अक्कलकोट,जि.सोलापूर ) व संकेत संतोष गुंडाळ (वय १७ रा. संभाजीनगर ,तळेगाव दाभाडे ता. मावळ,जि.पुणे) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. ते दोघेही अविवाहित होते.
एस.टी.बस चालक विष्णू मारुती घुले (वय 43,रा.डोळेवाडी,ता.जामखेड,जि.अहमदनगर)याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या संदर्भात मयत सिद्धाराम बंदिछोडे याचा मोठा भाऊ बिराप्पा मल्लाप्पा बंदिछोडे (वय 27रा.)यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव मंडळाच्या पूजेचे साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून (एम. एच.१४ बी पी - २३१४) सिद्धाराम बंदिछोडे व त्याचा मित्र संकेत गुंडाळ हे सोमाटणे फाटा येथे जात असताना,मुंबईहून पुणे बाजूला जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जामखेड आगाराच्या बसची (क्र.एम. एच.20 बी.एल.- 4165)तळेगाव खिंडीत दुचाकीला पाठीमागून जोरात धडक बसली.या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना सोमाटणे फाटा येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.अपघाताचे वृत्त समजताच संभाजीनगर परिसरात शोककळा पसरली.सिद्धाराम हा दुचाकी चालवित होता.या अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला . घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.संकेत गुंडाळ हा तळेगाव दाभाडे येथील आदर्श विद्या मंदीर ज्युनिअर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत अकरावीच्या वर्गात शिकत होता. सिद्धाराम बंदिछोडे हा कुशल प्लंबर होता. तो तीन वर्षापूर्वी गावावरून कामानिमित्त तळेगाव येथे भावाकडे आला होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे करीत आहे.