धायरी: दुचाकीवरून कामावर निघालेल्या प्राध्यापक महिलेच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. वृषाली तुषार थिटे ( वय : ३८, रा. सुदत्त संकुल,शिंदे मैदानाजवळ, वडगाव बुद्रुक, पुणे) असे मयत महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत डंपरचालकाविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली थिटे या नऱ्हे येथील झील कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. शुक्रवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे कामावर दुचाकीवरून निघाल्या होत्या. वडगाव बुद्रुक येथील कॅनॉल लगतच्या शिंदे मैदानाजवळ आले असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांना धडक दिल्याने त्या खाली पडून चाकाखाली सापडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे व कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहचून त्यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.
सिंहगड रस्ता परिसरात टँकर आणि डंपर चालक भरधाव वेगाने चालवितात वाहने...धायरी परिसरात टँकर आणि डंपरच्या खेपा जास्ती व्हाव्यात, म्हणून काही चालक भरधाव वेगाने वाहने चालवतात. मात्र अचानक एखादा पादचारी अथवा दुचाकी चालक आडवा आला तर अवजड वाहन नियंत्रण करणे कठीण जाते आणि मग अपघात होतात. परिसरातील अवजड वाहनावर वेग मर्यादा असावी, तसेच जे चालक नियमांचे काटेकोरपणे पालन करणार नाहीत, अशा वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.