नसरापूर (पुणे) :पुणे-सातारा महामार्गावरील केळवडे (ता. भोर) येथील एम.टेक कंपनीसमोर बुधवारी दुपारी पोस्टमन अशोक नामदेव भांडवलकर (वय ५५, रा. केळवडे, ता. भोर) पोस्टाचे पत्र पोहोचवत असताना भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताच्या दिवशीच भांडवलकर यांचा ५५ वा वाढदिवस होता.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक नामदेव भांडवलकर (वय ५५, रा. केळवडे, ता. भोर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या पोस्टमनचे नाव आहे. पुणे-सातारा महामार्गावरून दुपारी पावणेचारच्या केळवडे हद्दीत सिद्धार्थ राजेश देशमुख हा दुचाकीवरून साताऱ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी पोस्टमन अशोक भांडवलकर हे पत्र देण्यासाठी महामार्ग ओलांडत होते. त्यावेळी भरधाव दुचाकीने ठोकर दिली. त्यात अशोक भांडवलकर गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी नसरापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दि.९ नोव्हेंबरला अशोक यांचा वाढदिवस होता. परंतु याच दिवशी त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी सिद्धार्थ राजेश देशमुख (वय २१, आनंदनगर सिटी, वडगाव बुद्रुक) याच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार उमेश जगताप हे तपास करीत आहेत.