यवत (पुणे) : राखी बांधायला आलेल्या बहिणीचा भावासमोरच अपघाती मृत्यू झाला असून ही दुर्दैवी घटना पुणे सोलापूर महामार्गावर बोरी भडक चंदनवाडी (ता. दौंड) गावच्या हद्दीत गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. वैशाली नितीन शेंडगे (वय २६, रा. हडपसर मंतरवाडी, ता. हवेली) असे मृत्यू पडलेल्या बहिणीचे नाव आहे.
बहीण राखी बांधण्यासाठी आली असता तिचा भाऊ विलास विश्वनाथ कोपनर (वय ३४, रा. बोरीभडक कोपनर डेअरीजवळ, ता. दौंड) हे तिला घेऊन दुचाकी (क्र. एमएच ४२ डी ९५६) वरून पुणे- सोलापूर महामार्गावरून जात होते. हॉटेल जयभवानीसमोर आले असताना पाठीमागून आलेल्या पुणेकडून सोलापूरकडे जाणाऱ्या कार (क्र. एमएच ४२ झेड ४१४७) सफारी गाडीने जोरात धडक दिली, तसेच वैशाली हिला गाडीने फरफटत ओढत नेले. डोक्याला, हातापायाला किरकोळ व गंभीर मार लागल्याने व ती जागीच बेशुद्ध पडल्याने तेथील लोकांनी रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी कार चालक मोहन रावसाहेब डोंबे (रा. खोर डोंबेवाडी, ता. दौंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस करत आहेत.