पुणे : शाळेत कार्यकम असल्याने एका वगार्तून दुस-या वर्गात जात असताना दुसरीत शिकणारी मुलगी चुकून शाळेतून बाहेर पडली. कर्वेनगर चौकात ती पोलिसांनी रडत उभी असल्याचे दिसले. त्यानुसार तिच्याकडे व परिसरातील शाळांमध्ये चौकशी करून कर्वेनगर पोलीस चौकीच्या पोलिसांनी तिला सुखरुपपणे पालकांच्या स्वाधीन केले. वारजे-माळवाडी पोलीस ठाण्याच्या अंकित कर्वेनगर पोलीस चौकीत नेमणुकीस असलेल्या पोलीस नाईक अमर भोसले व पोलीस शिवाई संतोष गवारी यांना ही कामगिरी केली. पोलिसांना मंगळवारी कर्वेनगर भागात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लहान मुलगी रडत असताना दिसली होती. तिच्याकडे स्कूलबॅग व इतर साहित्य होते. मात्र, गणवेश नसल्याने तिच्या शाळेची माहिती समजू शकत नव्हती. तिला नाव पत्ता विचारला असता तिने अनन्या असे नाव सांगितले. मात्र, तिला पूर्ण नाव व पत्ता सांगता आला नाही. यामुळे तिला कर्वेनगर पोलीस चौकीत नेऊन तिचे दप्तर तपासण्यात आले. यामध्ये एका वहीवर तिचे नाव अनन्या अमोल काळे असो असल्याचे लक्षात आले. मात्र, तिच्या पालकांचा पत्ता आणि मोबाइल नंबर सापडला नाही. यामुळे पोलीस कर्मचा-यांनी त्या लहान मुलीचे मोबाइलमध्ये छायाचित्र काढून घेतले. कर्वेनगरमधील सर्व शाळांमध्ये जाऊन या मुलीचे छायाचित्र दाखवण्यात आले. यावेळी ही मुलगी सम्राट अशोक या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील असल्याचे समजले. त्यानुसार मुलीच्या पालकांना व शाळेच्या मुख्याध्यापकांना चौकीत बोलावून घेऊन तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. शाळेमध्ये एक कार्यक्रम असल्याने मुलांना एका वर्गातून दुस-या वर्गात नेत असताना मुलगी नजरचुकीने शाळेबाहेर गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
चुकीने शाळेबाहेर पडलेली चिमुकली पालकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 8:32 PM