लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगद्यात सोमवारी (4 डिसेंबर) रात्री सात वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगद्यात अज्ञात वाहनांमधून इंधन गळती झाली होती. तसेच रात्री मावळ परिसरात झालेल्या पावसाने रस्ते निसरडे झाले होते. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेले एक वाहन या इंधनावरुन घसरल्याने मागील वाहनांनी ब्रेक मारला, अचानक समोरची गाडी थांबल्याने एकामागे एक अशी सात वाहने एकमेकांवर आदळत विचित्र अपघात झाला.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातात कोणी जखमी झाले नाही मात्र सर्वच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अरबी समुद्रात आलेल्या ओखी वादळामुळे सोमवारी सायंकाळपासून लोणावळा व मावळ परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पावसाच्या सरी कमी अधिक प्रमाणात कोसळत असल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. तसेच वेगवान वा-यामुळेदेखील मुंबई पुणे द्रुतगती तसेच राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांनी व वाहन चालकांनी वाहने चालविताना वेगावर नियंत्रण ठेवत काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.