वारजे : शिवणेतील नदीपात्रात बुधवारी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांच्या अयोग्य नियोजनामुळेच हा अपघात झाला अशी चर्चा सुरू आहे. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला होता. त्यावेळी उत्तमनगर पोलिसांनी उशिरा पोलीस बंदोबस्त दिला. तसेच पुलावर पाणी आल्यावर हे पाणी पाहायला बघ्यांची गर्दी झाली होती. त्यावेळी त्यांनी योग्य बॅरिकेडिंग करून तेथेच थांबणे गरजेचे असताना सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास लोकमत प्रतिनिधींनी पाहणी केली असता, तेथे पोलीस उपस्थित नव्हते.
याबाबत वरिष्ठ निरीक्षक सुनील जैतापूरकर यांना कळविले असता थोड्या वेळाने ते दोन कर्मचारी तिथे प्रकट झाले. या ठिकाणी उशिरा बॅरिकेडिंग करण्यात आले. पुलावरून पाणी वाहत असताना रात्रीच्या वेळी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसतो. हा अपघातही पहाटेच्या सुमारास झाला आहे.
समन्वयाचा अभाव
उत्तमनगर पोलीस ठाणे हे पुणे शहर आयुक्तालयाच्या अंतर्गत येते. पलीकडे नांदेड हे गाव हवेली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असून हवेली पोलीस ठाणे ग्रामीण हद्दीत येते. यामुळे या दोन पोलीस ठाण्यांमध्ये कायम समन्वयाचा अभाव दिसतो. पाणी पुलावरून वाहत असताना या ठिकाणी २४ तास दोन्ही बाजूने पोलीस बंदोबस्त असावा व कर्मचारी तेथेच आहेत याबाबत वरिष्ठांनीही खातरजमा करावी, अशी अपेक्षा आहे. नाहीतर पाण्याचा विसर्ग वाढल्यावर असे अपघात होतच राहतील.