पुणे : टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यात बंद पडलेल्या ट्रेलरला पाठीमागून धडक दिल्याने ट्रेलरच्या पाठीमागे थांबलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. धनाजी ऊर्फ अण्णासाहेब सुखदेव जाधव (वय ३५, रा. वाळेखिंडी, ता. जत, जि. सांगली) व विजयकुमार महादेव काशीद (वय ३९, रा. सोनंद, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी दोन मृत व्यक्तींची नावे आहेत. ही घटना मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील भूमकर पुलावर शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने निघालेला ट्रेलर (एनएल ०१ एल ८६३६) शनिवारी रात्री दोनच्या सुमारास नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ आला असता, ट्रेलरमध्ये बिघाड झाल्याने गाडी रस्त्यामध्येच बंद पडली. त्यातील चालक धनाजी ऊर्फ अण्णासाहेब सुखदेव जाधव व सहचालक विजयकुमार महादेव काशीद दोघे जण खाली उतरून ट्रेलरच्या पाठीमागे उभे राहून इतर वाहनांना बाजूने जाण्याचा इशारा करीत असताना पाठीमागून आलेल्या टेम्पो (डीएन ०९ एन ९८१८) चालकाचे टेंपोवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यात थांबलेल्या ट्रेलरला पाठीमागून धडक दिली.
ह्या अपघातात ट्रेलरच्या पाठीमागे थांबलेले दोघेही चालक चेंगरले गेल्याने त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. यात धडक देणारा टेम्पोचालकही जखमी झाला असून अपघाताची खबर समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके व पोलीस उपनिरीक्षक डी. बी. खेडकर व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. भरधाव वेगाने वाहन चालवून ट्रेलरला पाठीमागून धडक देऊन दोघांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन तसेच स्वत:ही जखमी होऊन दोन्ही गाड्यांचे नुकसान होण्यास कारणीभूत झाल्याने टेम्पोचालक मनोजकुमार छोटेलाल यादव (वय ३८, रा. पेल्हार, डोंगरपाडा, ता. पालघर, जि. वसई, मूळ जोनपूर, उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेऊन सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्याबाबत ट्रेलरचा क्लीनर सागर कांबळे यांनी फिर्याद दिली असून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. बी. खेडकर अधिक तपास करीत आहेत.