पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुन्या महामार्गावरीलअपघात रोखण्यासाठी बारा पथकांमार्फत पुढील सहा महिने २४ तास गस्त घालण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन विभाग आरटीओकडून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे दाेन्ही महामार्गांवर अपघात कमी हाेण्यासाठी मदत हाेईल.
मुंबई- पुणे नवीन द्रुतगती महामार्गावर आणि जुना महामार्गावर पुढील सहा महिन्यांसाठी ‘सुरक्षा’ या रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमाचे आयोजन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. याची सुरुवात गुरुवारी (दि. १ डिसेंबर) हाेणार आहे.
माेटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी-चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत अधिकाऱ्यांमधून १२ पथकांची निर्मिती केली असून त्यात तीस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. त्यातील दाेन्ही महामार्गांवर प्रत्येकी ६ पथके आणि १५ अधिकारी कार्यरत राहतील. या उपक्रमावर देखरेखीसाठी राज्य परिवहन उपायुक्त रस्ता सुरक्षा कक्ष भरत कळसकर यांची नियुक्ती केली आहे.
रस्त्यावरील अपघातांचे शास्त्रीय विश्लेषण केले असता त्यामध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त अपघात हे चालकांच्या निष्काळजीपणामुळे तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे हाेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी केले आहे.
दाेन्ही महामार्गांवर राबविण्यात येणाऱ्या उपाययाेजना
- अपघातग्रस्त ठिकाणांचे (Black Spot) सर्वेक्षण तसेच उपाययोजना करणे आणि तेथे घडलेल्या अपघातांची माहिती देणारे फलक प्रदर्शित करणे.- महामार्गावर अवैधरीत्या पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई तसेच वाहतुकीत निर्माण झालेले अडथळे दूर करणे.- महामार्गावरील टोलनाक्यावर उद्घोषणा करून जनजागृती निर्माण करणे.- अतिवेगाने चालणाऱ्या वाहनांवर इंटरसेप्टर वाहनांद्वारे कारवाई करणे.- उजव्या मार्गिकेतील ट्रक, बस, कंटेनर आदी कमी वेगाने चालणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे.- चुकीच्या पद्धतीने मार्गिका लेन बदलणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे.- विना हेल्मेट, विना सीटबेल्ट प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि चालक, प्रवाशांवर कारवाई करणे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघात जास्त
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर या वर्षी ऑक्टाेबरअखेर १६८ अपघात झाले असून ६८ नागरिक मृत्युमुखी, तर ९२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जुन्या महामार्गावर २३१ अपघात झाले असून, १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १६० लाेक जखमी झाले आहेत.
अपघात कमी करण्याच्या दृष्टीने ‘सुरक्षा’ या उपक्रमाची आखणी
महामार्गावर भरधाव वाहने चालविणे, सीटबेल्टचा वापर न करणे, लेनची शिस्त न पाळणे आदी नियमभंग वाहनचालक करतात. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ हाेत आहे. वाहनचालकांना शिस्त लावणे, तसेच वाढते अपघात कमी करण्याच्या दृष्टीने ‘सुरक्षा’ या उपक्रमाची आखणी केली आहे. - डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे