पुणे : प्रवाशांना धमकावून लुटमार करणार्या रिक्षाचालकासह साथीदारांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली.
वसिम अजमल खान(वय ३१), अन्सार आयुब खान (वय ३२, दोघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा), मोसीन खान नुर खान पठाण (वय २२, रा. सुरेशदादा जैननगर, हुडको, पिपाळा, जि. जळगाव), अब्दुल करिम बार्शीकर (वय २६, रा. लोणी काळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़.
याप्रकरणी सेल्वम पिल्ले (वय ४८, रा. स्प्रींग हाईटस सोसायटी, दत्तनगर, कात्रज) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. पिल्ले मार्केटयार्डै येथून बालाजीनगर येथील आहिल्यादेवी चौकात जाण्यासाठी पॅसेंजर रिक्षात प्रवासी म्हणून बसले होते. प्रवासादरम्यान पिल्ले यांना रिक्षाचालक व त्याच्या तीन साथीदारांनी धक्काबुक्की करून त्यांच्याकडील सोन्याची साखळी काढून घेतली होती.
सातारा रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले. चित्रीकरणात आढळलेल्या संशयित रिक्षाच्या वाहन क्रमांकावरुन तपास सुरू करण्यात आला. पोलीस अंमलदार सागर शिंदे व संदीप ननवरे यांना या गुन्ह्यातील रिक्षा कोंढव्यातील शिवनेरी नगर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून प्रवाशांना लुटण्याचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, गुन्हे शाखेतील निरीक्षक युनूस मुलाणी, उपनिरीक्षक सुधीर घाडगे, बापू खुटवड, प्रकाश मरगजे, संदीप ननवरे, सतीश चव्हाण यांनी ही कारवाई केली.