पुणे : कोणत्याही कला क्षेत्रातील आवड आणि त्यामधील सातत्य कलाकाराला घडवते. ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘रेडू’ या चित्रपटासाठी विजय नारायण गवंडे यांना उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भजनी मंडळात वडिलांना साथसंगत करणारा मुलगा ते राज्य पुरस्कार विजेता असा प्रवास तरुणाईला प्रेरणादायी ठरणारा आहे.मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल येथे विजय लहानपनापासूनच वडिलांना भजनी मंडळात साथसंगत करायचे. संगीताचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता कोणतेही वाद्य ते लीलया वाजवायचे. एका आॅर्केस्ट्रातील सिंथेसायजर आणि इतर आधुनिक वाद्ये पाहून त्यावर प्रभुत्व मिळवण्याचा त्यांनी ध्यास घेतला. १९९४ मध्ये वडिलांकडून पैसे घेऊन त्यांनी एक नवीन सिंथेसायझर विकत घेतला आणि तिथून संगीतप्रवास सुरु झाला. रोजचा सराव आणि रियाज, त्यातून तयार झालेला अल्बम, अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत आणि संगीत देण्याची संधी यातून विजय यांचा प्रवास घडत गेला. सांस्कृतिक कला दर्पण पुरस्कारानंतर महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील पुरस्कारांवर त्यांनी मोहोर उमटवली.याबाबत ‘लोकमत’शी विजय गवंडे म्हणाले, ‘संगीताची आवड असल्याने सुरुवातीच्या काळात पुण्यात एका आॅर्केस्ट्राला साथ देत होतो. एके दिवशी याच आॅर्केस्ट्रातील प्रमुख संगीतकार आजारी पडले. त्यावेळी घाबरत घाबरत कार्यक्रम पार पाडला. सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना उषा मंगेशकर, आशा भोसले अशा दिग्गजांना साथसंगत देता आली. रियाझ आणि सरावाची सवय कायम ठेवली.’
साथसंगतकार ते राज्य पुरस्कार विजेता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 10:24 PM
भजनी मंडळात वडिलांना साथसंगत करणारा मुलगा ते राज्य पुरस्कार विजेता असा प्रवास तरुणाईला प्रेरणादायी ठरणारा आहे.
ठळक मुद्दे५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘रेडू’ या चित्रपटासाठी विजय नारायण गवंडे यांना उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार