पुणे : सामाजिक समरसता हा एकेकाळी कुचेष्टेचा असलेला विषय मान्य होऊन आज देशव्यापी बनला आहे. विरोध होऊनही त्याची प्रक्रिया सुरेश नाशिककर यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्यांमुळे गतिमान झाली, असे गौरवोद्गार राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष भिकुजी इदाते यांनी रविवारी येथे काढले.सामाजिक समरसता मंचतर्फे माजी उपमहापौर, परिट समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ऊर्फ नाना नाशिककर यांचा संत गाडगेबाबा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी समरसता मंचचे संस्थापक सदस्य रमेश महाजन, सहसंयोजक रमेश पांडव, प्रांत कार्यवाह विजय गावडे, शहर अध्यक्ष नंदकुमार राऊत, समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्ष श्यामाताई घोणसे, कमल नाशिककर आदी व्यासपीठावर होते. २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पारितोषिकाचे स्वरूप होते. सत्काराला उत्तर देताना नाशिककर यांनी अनेक आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता दोनदा डेक्कनसारख्या भागातून पालिकेवर गेला. मतांचा बाजार होत असताना लोकांच्या पाठबळावर उपमहापौरही झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार डोळ्यांसमोर ठेवून काम केल्याने यश मिळाले. सामाजिक कीर्तनाचा आदर्श घालून देणाऱ्या गाडगेबाबा यांच्या नावाचा उल्लेख कीर्तनकार करत नाहीत. त्यामुळे ५० कीर्तने विविध भागांत करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.श्यामाताई घोणसे यांनी नाशिककर यांच्या प्रकाशन व्यवसायाची माहिती सांगितली. सुनील भणगे यांनी स्वागत केले. विजय गावडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
समर्पित कार्यकर्त्यांमुळे समरसता गतिमान
By admin | Published: December 26, 2016 3:52 AM