पुणे : रवींद्र धंगेकर आमची काम करतात. आम्हाला भेटून विचारपूस करतात, आम्ही त्यांच्याकडे एक चांगला माणूस म्हणून बघत आहोत. आमच्या दृष्टीने धंगेकर हा देव आहे. तो नेहमी संकटाला धावून येतो अशा प्रतिक्रिया देत कसब्यातील नागरिकांनी धंगेकरांनाच मतदान करणार असल्याचे सांगितले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमतने कसब्यातील नागरिकांशी संवाद साधला.
आगामी निवडणुकीत कसबा विधानसभेचे सध्याचे चित्र पाहता मागचेच स्पर्धक पुन्हा रिंगणात आहेत. म्हणजे २०२३ च्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, त्याच निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे हेमंत रासने अशीच ही लढत होणार आहे. पण आताची लढत दुरंगी नसून तिरंगी होणार असल्याचे दिसते आहे. कारण मनसेचे गणेश भोकरे या मैदानात उतरले आहेत. पण आता लोकांनी धंगेकरांना पसंती दिल्याचे वास्तव समोर आले आहे. हेमंत रासनेंबाबत विचारले असता ते आम्हाला कधी इथं दिसलेच नाहीत. अशीही उत्तरं नागरिकांनी दिली आहेत. मनसेच्या गणेश भोकरे यांच्याबाबत मात्र नागरिकांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
धंगेकर आले आमचं काम केलं, ड्रेनेज लाईन सुधारली. आम्हाला सुरळीत पाणी दिले, रासने कधी आलेच नाहीत, धंगेकर यावा अशीच आमची इच्छा असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. महिलांनी धंगेकर फिक्स येणारच असा विश्वासही यावेळी व्यक्त केला आहे. धंगेकरांना भेटायला भीती वाटत नाही. पण इतरांना भेटायला भीती वाटते असं म्हणत रासने कधी फिरकले नाहीत असंही नागरिक म्हणाले आहेत. धंगेकर आताही काम करतात आणि निवडून आल्यावरही करतील. प्रत्येकांच्या हाकेला ते उभे असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता महाराष्ट्राचं नाव मोठं होईल असं बघतच नाही. स्थानिक आमदार पैकी सगळ्यांनी काम केलंय. पण आम्ही मतदानाच्या दिवशी योग्य व्यक्तीला मतदान करू असंही काहींनी सांगून आपलं मतं गुप्त ठेवल्याचे दिसून आलंय. आतापर्यंत धंगेकरला मतदान केलं. मग आता त्यालाच करणार. तो घराघरात लक्ष देतो. त्याने आमच्या नळाचं काम केलं. आमच्याकडे दुसरे कोणी आलेच नाहीत.अशी प्रतिक्रिया एका आजींनी दिली. आमच्या दृष्टीने धंगेकर देव आहे. संकटाला धावून येतो आम्ही त्यालाच मतदान करणार असल्याचे एका नागरिकाने सांगितले. मी ३०, ४० वर्षे शनिवार पेठेत राहिली आहे. पण आम्ही काँग्रेसला मत देत आलोय. गाडगीळ निवडून आले होते. आम्ही शनिवार पेठेत राहून पक्ष बदलला नाही.
यंदा आघाडीचे सरकार यायला हवे. भाजपचा काही उपयोग नाही. धंगेकर कामाचा माणूस आहे. भाजप मनसे आपलं नाही. सगळी महागाई वाढली. आता सत्ता बदलायला पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार यायला हवे. यंदा कसब्यात काँग्रेसच येईल. असेही काही नागरिकांनी यावेळी अंगितले आहे. तर एका नागरिकाने हेमंत रासनेला मत देणार. आपली संस्कृती जपण्यासाठी आम्ही त्यांना आणि भाजपला मत देऊ असं सांगितलं आहे. लोकसभेला कसबा विधानसभा मतदार संघातून रवींद्र धंगेकर यांना सर्वात कमी मतं मिळाली होती. त्यामुळे धंगेकर यांच्यासमोर धोक्याची घंटा आता वाजली आहे. तर तर हेमंत रासने यांनी पोटनिवडणुकीचा पराभव मनावर घेतला आहे. पराभवांनंतर ग्राऊण्ड लेव्हलवरून त्यांनी कामाला सुरुवात केल्याचे दिसून आले आहे. महाआरोग्य अभियान, लाडकी बहिण योजनेची नोंदणी मोहीम तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवलाय. परंतु अजूनही लोकांकडून धंगेकरांचे कौतुक ऐकायला मिळत आहे. शेवटी सर्वकाही मतदार राजावरच अवलंबुन असणार आहे. कसब्याचा बालेकिल्ला कोण जिंकणार? हे २३ तारखेच्या निकालावरूनच स्पष्ट होणार आहे.