पुणे : विरारमधील खून प्रकरणात नऊ वर्षे फरारी असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. हडपसर भागात तो राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर युनिट ३ च्या पथकाने छापा मारून त्याला पकडले.
जितेंद्रसिंग सेवासिंग उर्फ सुभीसिंग जुनी (रा. विरार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जुनी हा मूळचा विरार, मुंबई येथे राहणारा आहे. साथीदारांच्या मदतीने २०१२ मध्ये चेगनसिंग घुंगरूसिंग टाक (वय २४, रा. विरार) याचा खून करून तो पसार झाला होता. त्यानंतर टाकने आॅगस्ट २०२० मध्ये फिल्लासिंग घुंगरूसिंग टाक (वय ४०) याचा साथीदारांच्या मदतीने खून केला होता. दोघा सख्ख्या भावांचे खून करून तो फरार झाला होता. पोलिसांची अटक टाळण्यासाठी तो हैद्राबाद, राजस्थान भागात राहात होता. त्यानंतर तो नुकताच रामटेकडी परिसरात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ३ ला मिळाली. तिथे छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र्र मोकाशी, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, उपनिरीक्षक गुंगा जगताप, दीपक क्षीरसागर, राजेंद्र मारणे, दीपक मते, रामदास गोणते, सुजित पवार यांनी ही कारवाई केली.
---