पुणे : पाच वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खुनाचा गुन्हा सिद्ध न झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी हा आदेश दिला. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २०१६ मध्ये ही घटना घडली होती.
हरी दासू राठोड (वय ५५, रा. खडकी) असे निर्दोष मुक्तता केलेल्याचे नाव आहे. आनंद सखाराम वाघमारे यांच्या खुनाच्या आरोपात राठोड यांना अटक करण्यात आली होती.
कविता राठोड पतीपासून वेगळ्या झाल्यानंतर दोन मुलांसमवेत आनंद वाघमारे यांच्याबरोबर राहात होत्या. त्या दोघांनी लग्न केल्याचा अंदाज आहे. हरी दासू राठोड हा त्यांचा मामा आहे. आरोपी हे कविताच्या कुटुंबाबरोबर राहायला येत असत. आरोपीला कविता यांच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा होती. मात्र, कविताने दुसरे लग्न केल्यामुळे आरोपी खूश नव्हते. त्यामुळे ते कविता आणि आनंद यांच्याशी वाद घालत. ३१ आॅक्टोबर २०१६ रोजी रात्री कविताच्या गालावर आणि मुलीच्या डोक्यावर कुणीतरी जड वस्तूने मारले. आरोपी हा सिमेंटची वीट फेकून पळताना त्यांनी पाहिले. आनंद हा देखील स्वीमिंग पुलाजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. १ नोव्हेंबर २०१६ ला त्यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये हरी राठोड याच्याविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणात सहा साक्षीदार तपासले. मात्र सरकारी वकिलांना हरी राठोड यांनीच वाघमारे यांचा खून केल्याचे सिद्ध करता न आल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे ॲड. मुजाहिद पठाण व ॲड. मनोज कदम यांनी तर सरकारी पक्षातर्फे ॲड. व्ही. एम. फरगडे यांनी काम पाहिले.