पुणे: टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात (TET Exam scam) अटक केलेला आरोपी अधिकारी सुशील खोडवेकरला (sushil khodvekar) कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची बाधा झाल्याच्या उघड झाल्यानंतर खोडवेकरला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परीक्षेतील गैरव्यवहारात खोडवेकरचा समावेश असल्याचे समोर आल्यावर पुणे पोलिसांनी त्याला अटक केली होती.
शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने (cyber branch pune police) शालेय शिक्षण, क्रीडा विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकरला शनिवारी ठाण्यातून अटक केली होती. मंत्रालयातील आयएसएस दर्जाच्या आधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली होती. खोडवेकर सध्या मंत्रालयातील कृषी विभागात उपसचिव आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० मधील गैरव्यवहार प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. याप्रकरणात शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नोलाॅजीस कंपनीचा संचालक डाॅ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक अश्विनीकुमार तसेच शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह ३० ते ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी-२०२०) गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात सात हजार ८८० अपात्र उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले असून त्यांच्याकडून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये घेण्यात आले असून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.