पुणे : कात्रजमधील दत्तनगर परिसरात पिस्तुलातून गोळीबार करून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आणि दहशत निर्माण करणा-या आरोपीला पोलिसांनी गुरुवारी (दि.१८) अटक केली.
अशोक गोविंदराव गवई (वय २८, रा. यश अपार्टमेंट, वारजे माळवाडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. रामधन भागीरथी विश्वकर्मा, राजासिंग ऊर्फ राजकुमार व सूरज (सर्व रा. संतोषनगर, कात्रज) ही त्याच्या साथीदारांची नावे आहेत. हे चौघेही मूळचे उत्तर प्रदेशमधील काबरा गावाचे रहिवासी आहेत. कामाच्या निमित्ताने ते शहरात वास्तवास होते. त्यांनी महिनाभरापूर्वी कात्रजजवळील दत्तनगरच्या चौकात एका व्यापाऱ्यावर गोळीबार करून रोकड लुटून नेली होती. तसेच शस्त्राच्या धाकाने त्यांनी त्या भागात दहशत माजवली होती.
या गुन्ह्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाअंती गवईला अटक केली. त्याने साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. त्याच्या साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. सहायक पोळी आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.