पिंपरी: दोन वर्षांसाठी पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार केलेले असतानाही आरोपी शहरात वावरत असल्याचे समोर आले. त्याला पोलिसांनी दापोडी येथून अटक केली. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने बुधवारी ही कारवाई केली.
सागर दत्ता चांदणे (वय २१, रा. खडकी), असे अटक केलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी विजय दत्तात्रय तेलेवार यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर चांदणे याला पुणे पोलीस आयुक्तासलयातील खडकी पोलीस ठाण्याच्या प्रस्तावानुसार पोलीस उपायुक्तस परिमंडळ चार यांनी २ डिसेंबर २०२० रोजी पुणे जिल्ह्यातून तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार केले होते. मात्र कोणतीही परवानगी न घेता आरोपी चांदणे हा पिंपरी -चिंचवड शहरातील दापोडी येथे आला. याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा लावून त्यास अटक केली. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.